बंद

    नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन कार्यक्रम

    • तारीख : 02/11/2022 -

    योजनेचे स्वरूप : 100% केंद्र पुरस्कृत

    योजनेचा तपशील : पारंपरिक ऊर्जा साधने जसे पेट्रोल, केरोसिन, कोळसा, नैसर्गिक वायू व लाकडी इंधन ही काळाच्या ओघात संपणारी ऊर्जा साधने आहेत. यांच्या वापरावरील भार कमी करण्यासाठी, ग्रामीण भागातील स्त्रियांचे जीवनमान सुधारण्यासाठी, सर्वसाधारण स्वच्छता तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सन 1982 – 83 पासून शासनाने राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम ही 100 % केंद्रीय क्षेत्र योजना कार्यान्वित केली आहे.

    सदर योजना जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी, कृषी विभाग, जिल्हा परिषद यांचेमार्फत राबविण्यात येते. या योजनेंतर्गत केंद्र शासन दरवर्षी राज्यास बायोगॅस संयंत्राचे उद्दिष्ट ठरवून देते. ठरवून दिलेले उद्दिष्ट राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना वाटप करण्यात येते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन राज्यास 100% निधी 2 ते 3 हप्त्यात उपलब्ध करुन देते.

    योजनेचे निकष :

    • योजना राबविताना लाभार्थी असलेल्या गावांचा समूह करून योजना राबविण्यात यावी.
    • बायोगॅस संयंत्राची मागणी निश्चित करताना लोकांचा सहभाग घ्यावा.
    • दोन किंवा अधिक जनावरे असलेल्या कुटुंबांची लाभार्थी म्हणून निवड करणे.
    • दोन किंवा अधिक जनावरे असलेल्या कुटुंबांची संख्या जास्त असल्यास अशा गावांच्या समूहाची निवड करणे.
    • ज्या जिल्ह्यात बायोगॅस संयंत्र कार्यान्वित राहण्याचे प्रमाण अधिक आहे व संयंत्रांच्या देखभाल व दुरुस्तीच्या सुविधा उपलब्ध आहेत, अशा भागास अधिक बायोगॅस संयंत्राचे उद्दिष्ट देण्यात यावे.
    • उद्दिष्टांचे वाटप करताना स्वयंसेवी संस्था, उद्योजकांकडील प्रशिक्षित गवंड्यांची संख्या विचारात घेऊन बायोगॅस संयंत्र वाटप करावेत.

    केंद्र शासनाने बायोगॅस संयंत्र बांधकामाचे नवीन दर निश्चित करुन दिनांक 02 नोव्हेंबर, 2022 रोजी नविन सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. सदरचे दर सन 2022-23 या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात आलेले आहेत.

    राज्यात बायोगॅसची तंत्रशुद्ध पद्धतीने उभारणी व्हावी म्हणून संयंत्र बांधणाऱ्या गवंड्यांना व ट्रेनर्सना या योजनेखाली प्रशिक्षण व उजळणी प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षित झालेल्या गवंड्यांकडून बायोगॅस संयंत्रे बांधली जातात. बायोगॅस संयंत्राचा वापर व देखभाल दुरुस्ती करण्यासंदर्भात लाभार्थ्यांनासुद्धा प्रशिक्षण देण्यात येते.

    केंद्र शासनाने दिनांक 02.11.2022 रोजीच्या मार्गदर्शक सूचनेतील सुधारित दर खालीलप्रमाणे
    अ. क्र. बाब संयंत्राचे आकारमान केंद्र शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान (प्रति संयंत्रास)
    अ) सर्वसाधारण लाभार्थी 1 घ. मी. रु. 9,800/-
    2 ते 4 घ. मी. रु. 14,350/-
    5 ते 7 घ. मी. रु. 22,750/-
    अनुसूचित जाती/जमाती 1 घ. मी. रु. 17,000/-
    2 ते 4 घ. मी. रु. 22,000/-
    5 ते 7 घ. मी. रु. 29,250/-
    ब) i) बायोगॅस संयंत्रास शौचालयास जोडल्यास 1 ते 10 घ. मी. रु. 1600/-
    ii) MNRE मान्य बायोगॅस स्लरी युनिट 1 ते 25 घ. मी. रु. 1600/-
    क) टनेज फीची ( 5 वर्षांच्या हमी कालावधीतील देखभाल दुरुस्तीसाठी )
    1 ते 10 घ. मी. पर्यंत संयंत्रास रु. 3000/-
    15 ते 25 घ. मी. आकारमान असलेल्या संयंत्रांसाठी मात्र टनेज फीची जॉब ऑफ पूर्व-निर्मित/उत्पादित बायोगॅस संयंत्रासाठी पात्र असणार नाही.

    बायोगॅस यादी

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे.

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे.

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा.