स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (R-SETI) संबंधीचे सर्व कामकाज

केंद्र शासनाने बेरोजगारीच्या प्रश्नावर तोडगा म्हणून श्री.धर्मस्थळ मंजूनाथेश्वर एज्यूकेशनल ट्रस्ट, सिंडीकेट बॅंक व कॅनरा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (Rural Development and Self Employment Training Institute) सन 1982 पासून स्थापन करण्यात आली. त्यानुसार शासन निर्णय दिनांक 19 जून, 2008 नुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात सदर संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला._

सदर संस्था त्या त्या जिल्ह्यातील लिड बँकामार्फत चालविण्यात येणार असून त्यासाठी राज्य शासनाने किमान ½ एकर जमीन विनामुल्य उपलब्ध करुन घ्यावयाची आहे. केंद्र शासनाकडून या संस्थेच्या बांधकामासाठी व इतर सुविधेसाठी रु.1 कोटी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जमीन उपलब्ध होऊन बांधकाम होईपर्यंत भाड्याच्या जागेत प्रशिक्षण सुरु करण्यात येत आहे.राज्यातील 33 जिल्ह्यात R-SETI मंजूर करण्यात आलेली आहे. सध्या या जिल्ह्यामध्ये भाडयाच्या जागेत तात्पुरत्या स्वरुपात प्रशिक्षण सुरु करण्यात आलेले आहे. सन 2012-13 या वर्षामध्ये एकूण 7875 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण घेतले आहे. या संदर्भात R-SETI साठी इमारत व इतर तत्सम बाबींची पूर्तता करण्याची कार्यवाही चालू आहे.